Monday, February 20, 2012

शय्यागृहात

भिंतीतल्या शेकोटीत जाळ धडाडून पेटला होता. जपानी टेबलावर रमच्या छोट्या सुरईजवळ साखरेचा पॉट आणि वाफाळलेल्या चहाची किटली अशी दोघांसाठी जय्यत तयारी होती.
सॅल्यूरच्या ड्यूकने आपली हॅट, हातमोजे आणि फरचा कोट खुर्चीवर फेकला तेंव्हा डचेस, संध्याकाळी पांघरलेली मखमली शाल दूर करून आरशात बघत आपले केस ठाकठीक बसवीत होती. आपल्या रत्नजडित बोटांनी केसांच्या बटा तिने कपाळावर नीट रचल्या. आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून ती खुशीने हसली. त्यानंतर ती आपल्या नवर्‍याकडे वळली. इतका वेळ, तो तिच्याकडे पाहात, बोलावे की बोलू नये यासाठी चाचरत होता. अखेर त्याने हिय्या केला, "तुला हवं तितकं बघितलं ना लोकांनी आज रात्री तुझ्याकडे?"
तिने त्याच्या नजरेला नजर भिडवली. तिचे धुंद डोळे विजयाने आणि मग्रूर आव्हानाने चकाकत होते.
"असं वाटतं खरं !"
ती खाली बसली. तिच्या समोरच्या आसनावर तोही बसला आणि त्याने कटकन आपले एक बोट मोडले.
"हे सर्व बघतांना मला .... मी खूप हास्यास्पद झालोय असं वाटतं"
"तुम्हाला तमाशा करायचाय काय?" तिने विचारले. " माझ्या वागण्यावर तुम्ही आता टीका करणार आहात?"
"छे छे लाडके, मला एवढंच म्हणायचंय की आज रात्री मिस्टर ब्युरेल तुझ्याबरोबर जसं वागत होते ते काही बरोबर नव्हते. मला थोडा जरी अधिकार असता तर ताबडतोब मी त्याला वठणीवर आणला असता..."
"कळलं! ते सगळं सोडा आणि जरा खरं बोला पाहू! गेल्या वर्षा पासून तुम्ही तुमच्या सर्व कल्पना बदलल्याहेत, हो की नाही? कोण माझ्याशी कसा वागतोय ह्याबद्दल वाटून घेणे तुम्ही सोडून दिलंय. ज्या दिवशी मला हे समजलं की तुम्ही एक बाई ठेवलीय आणि तुम्ही तिच्यावर प्रेम करता, त्याच दिवशी, जसं तुम्ही आज मला सांगता आहात, तसंच मीही तुम्हाला सांगितले होतं आणि अधिक पटेलसं सांगितलं होतं की मॅडम सेर्व्ही बरोबरचं तुमचं वागणं मला आवडण्यासारखं नाही. त्यामुळे मी दुखावली जातेय आणि त्यामुळे माझा उपमर्द होतोय. पण तुम्ही मला काय उत्तर दिलंत? तुम्ही म्हणालात, 'मी पूर्णपणे मुक्त आहे. दोन बुद्धीमान व्यक्तींचा विवाह म्हणजे केवळ एक भागीदारी. निव्वळ समाजाला दाखविण्यापुरतं एक बंधन - नैतिक नव्हे!' असंच म्हणाला होता ना तुम्ही? तुम्ही मला अशी माहिती सुद्धा दिली की तुमची ती प्रेयसी माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आकर्षक आहे. जास्त मोहक आणि अधिक स्त्रीसुलभ असणारी. बरोबर ? हेच शब्द तुम्ही वापरले होते - स्त्रीसुलभ. अर्थात हे सर्व तुम्ही मला फारच छानपणे, सभ्यपणे आणि नजाकतीने सांगितले होते. बोलण्याला माझ्या स्तुतीचा मुलामा दिला होता आणि अशा काही बेमालूम पण शालीन युक्त्या वापरल्या होत्या की ज्या फक्त एखाद्या घरंदाज गृहस्थालाच वापरणं जमू शकेल. त्या युक्तीला सर्वात जास्त दाद देणारी मीच होते. ह्या सर्वाचा निष्कर्ष एवढाच की तुम्हाला काय काय म्हणायचं होतं ते मला पूर्णपणे आणि अगदी बरोब्बर समजलं होतं. तेव्हाच आपण हे ठरवलं की आपण आता एकत्रच राहू, परंतु परस्परांपासून स्वतंत्र!
"तुम्ही मला असंही सांगितलं की जगासमोर देखावा टिकवून ठेवणं एवढंच फक्त तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आणि मला जर हवा असेल तर मीही एखादा प्रियकर शोधू शकते - फक्त तो गुप्त रहायला हवा. तुमच्या फर्ड्या वकतृत्व शैलीत तुम्ही बराच वेळ या विषयावर बोललात की आपल्या धन्यांना खुश राखण्यासाठी स्त्रिया किती कौशल्य आणी बुद्धिमत्ता वापरु शकतात इत्यादि इत्यादि.
"मी सर्व समजून घेतलं! अगदी तंतोतंत! त्यावेळी तुम्ही मॅडम सेर्व्हीच्या प्रेमात बुडाला होता, अगदी आकंठ बुडाला होता. आणि माझं प्रेम, अगदी कायदेशीर प्रेम सुद्धा तुमच्यासाठी एक कटकट होती. तेंव्हापासून आतापर्यंत आपण स्वतंत्र आयुष्ये जगत आलोय. आपण जोडीने बाहेर येतो जातो खरं, पण परततो ते मात्र आपापल्या स्वतंत्र जगात प्रवेश करण्यासाठी.
"परंतु गेल्या एक-दोन महिन्यांपासून मात्र तुम्ही एखाद्या मत्सरी पुरुषाप्रमाणे वागू लागला आहात. काय बरं कारण असावं याचं?"
"छे: छे: लाडके, मला मत्सर वगैरे वाटत नाही. पण भीती मात्र वाटू लागलीय. भीती वाटते की तू तुझ्या चारित्र्याशी तर तडजोड करून बसणार नाहीस?"
"चारित्र्याविषयी बोलायचं म्हटलं तर तुमचं धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे, असं काही मला वाटत नाही."
"हे बघ, ही काही हसण्यावारी नेण्यासारखी बाब नाही. मी तुझ्याशी खरंच गंभीरपणे बोलतोय, एखाद्या मित्रासारखा ! आणि तू आता जे काही बोलत होतीस ना, ते अत्यंत अतिशयोक्त बोलणं होतं."
"बिलकुल नाही! मी बोलले त्यातलं एक वाक्यही अतिशयोक्त नाही. तुम्ही स्वत:च हे कबूल केलं होतंत की तुम्ही एक दुसरा संबंध ठेवलाय आणि तुमचंच अनुकरण मीही करावं. ह्यात अयोग्य काहीही नाही. परंतु मी मात्र तसं काहीच......"
"मला स्पष्टीकरण ..."
"प्लीज, मला आधी संपवू द्या. मी तसं काहीच केलं नाही. मी एकही प्रियकर शोधला नाही किंवा नव्हता! निदान आतापर्यंत तरी! मी वाट पाहतेय, शोधतेय, पण मला शोभेल असा एकही अद्याप सापडा नाही. तो अत्यंत चांगला, छान असायला हवा. तुमच्यापेक्षाही. हा मी तुम्हाला दिलेला कॉम्प्लिमेंट आहे, पण तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही!"
"हे सर्व जोक्स अत्यंत गैरलागू आहेत."
"परंतु मी जोक करत नाहीये. तुम्ही काय काय बोललात त्यातला एक शब्दही मी विसरलेले नाही. ज्या दिवशी मी जशी आज आहे तसं असणं सोडेन त्या दिवशी तुम्ही काहीही करू शकणार नाही. ऐकलंत? तुम्हाला मी बदललेय ह्याची साधी शंका सुद्धा येणार नाही. आणि पाहता पाहता तुम्ही इतर अनेकांप्रमाणे एका छिनाल बाईचा नवरा बनलेला असाल!"
"ओफ ! तू असले शब्द कसे काय वापरू शकतेस?"
"मी असले शब्द कसे काय वापरू शकते? पण जेव्हा मॅडम गेर्स ने मिस्टर सेर्व्हीबद्दल हेच शब्द वापरले होते तेव्हा तुम्हीच हसण्याचा गडगडाट केला होतात!"
"जे वाक्य मॅडम गेर्स च्या तोंडी विनोदी वाटेल ते तुझ्याही तोंडी वाटेल असे नाही."
"बिलकुल खोटं! 'छिनाल बाईचा नवरा' हे शब्द तुम्हाला मिस्टर सेर्व्हीच्या संदर्भात वापरणं नक्कीच मजेदार वाटलं असेल. पण तुमच्या बाबतीत वापरले तर मात्र तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या! हे सर्व तुमच्या दृष्टीकोनावर अबलंबून आहे. खरं सांगायचं तर हा शब्द काय न् तो शब्द काय, मी फारसा विचार केला नव्हता. मी फक्त हे पाहावयासाठीच तो शब्द वापरला की तुम्ही आता पूर्णपणे तयार झाला आहात की नाही!"
"तयार ? कशासाठी ?"
"का? फसवलं जाण्यासाठी! तो शब्द ऐकल्यावर एखादा माणूस जेंव्हा चिडतो तेंव्हा त्याचा अर्थ असा होतो की.....अं.....तो बऱ्यापैकी तयार होतोय. परंतु येत्या दीड-दोन महिन्यातच माझ्या या वाक्यावर सर्वात आधी तुम्हालाच हसू येईल. कारण जेंव्हा एखादा माणूस स्वत:च त्या अवस्थेत जातो तेंव्हा त्याबद्दल त्याला रागबिग येईनासा होतो."
"तू आज रात्री फारच विचित्र बोलतेयस. असं बोलतांना ह्यापूर्वी मी तुला कधीही पाहिलं नव्हतं."
"म्हणजेच मी बदललेय. आणखीनच बिघडत जाण्यासाठी आणि त्याला तुम्हीच जवाबदार आहात!"
"हे बघ, आपण जरा गंभीरपणे बोलू या. मी तुम्ही विनवणी करतो, तुला हात जोडतो, पण त्या ब्युरेल साहेबांना तुझ्याशी आजच्या सारखा लघळपणा यापुढे कधीही करु देऊ नकोस."
"मी बोलले तेच बरोबर आहे. तुम्ही मत्सरी आहातच!"
"नाही नाही. मला फक्त माझं सर्वांसमोर हसू व्हावं हे आवडत नाही, एवढंच. मी चारचौघांच्या टिंगल टवाळीचा विषय बनावं हे मला नकोय. यापुढे जर मी त्या माणसाला तुझ्या खांद्यावर डोकं टेकवताना बघितलं किंवा डोकं खांद्याच्याही खाली छातीवर ........"
"ते त्यांच्या कानाचं ऐकण्याचं यंत्र शोधत होते."
"मी त्याचा ..... मी त्याचा .....कान कापून टाकीन!"
"अहो पण असं काही करण्यासाठी तुम्ही काही माझ्यावर प्रेम करीत नाही. करता का?"
"मी यापेक्षाही काहीतरी बरं वाईट करीन!"
"ठीक आहे, ठीक आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की मी मात्र तुमच्यावर बिलकुल प्रेम करीत नाहीये!"
ड्यूक जागेवरून उठला. टेबलाला वळसा घालून बायकोच्या पाठीमागे गेला आणि हळूवारपणे त्याने तिच्या मानेचा मागून मुका घेतला. त्याबरोबर ती उसळून उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यांत पाहात म्हणाली, "कृपा करून असला मूर्खपणा पुन्हा करु नका. ते सर्व केंव्हाच संपलंय आणि आपण आता वेगळे राहतोय."
"ओह! रागावू नकोस. पण आताशा तू मला फारच मोहक वाटायला लागलीयेस बघ!"
"अच्छा! म्हणजे मी जिंकले म्हणायची! तुम्हाला सुद्धा आता वाटू लागलंय मी मी खूप सुंदर दिसायला लागल्येय!"
"तू खरोखरच सुंदर आहेस. तुझे हात, तुझे खांदे, तुझी कांती ........"
"ब्युरेल साहेबांनाही मोहात पाडण्यासारखी आहे, हो ना?"
"किती क्रूर आहेस तू! पण खरंच, अद्यापपर्यंत मी तुझ्याइतकी सुंदर दिसणारी एकही स्त्री पाहिली नाही."
"हं! तुम्हाला फार काळ उपास घडलेला दिसतोय."
"काय म्हणालीस?"
"मी असं म्हणाले की तुमची फार दिवस उपासमार झालेली दिसतेय."
"म्हणजे? काय, म्हणायचंय काय तुला?"
"जेंव्हा एखाद्या माणसाला उपास घडतो तेव्हा तो भुकेला असतो आणि जेंव्हा तो भुकेला असतो तेंव्हा तो काहीही खाण्यास मागेपुढे पाहात नाही. अशाही गोष्टी, ज्यांच्याकडे तो एरवी कधी ढुंकूनही पाहणार नाही. मी सुद्द्धा असाच एक खाद्यपदार्थ आहे, ज्याकडे तुम्ही नेहमीच दुर्लक्ष केलंत. पण आज मात्र ही डिश पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय."
"ओ गॉड! मार्गारेट, असलं बोलायला तुला शिकवलं तरी कुणी?"
"कुणी काय? तुम्हीच! बघा, मॅडम सेर्व्ही बरोबरचे तुमचे संबंध तुटल्यानंतर, माझ्या माहितीप्रमाणे, तुम्ही चार बाया ठेवल्यात. त्या चारही चटकचांदण्या त्यांच्या क्षेत्रात एक्स्पर्ट होत्या. असं असल्यावरही आज अचानक तुम्हाला माझा जो पुळका आलाय, त्याचा अर्थ तुम्हाला उपास घडतोय असा लावू नये तर कसा लावावा?"
"हे पहा, आता तुझ्याशी अगदी उघडपणे बोलायला हवं. आणि अगदी मुद्द्याची गोष्ट सांगायची तर मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलोय! अगदी वेडा झालोय त्यामुळे!"
"अच्छा! म्हणजे तुम्हाला पुन्हा......... 'त्या'ची सुरुवात करायचीय म्हणता?"
"होय! करायचीय!"
"आजच रात्री?"
"ओ! मार्गारेट!"
"बघा! तुम्हाला पुन्हा धक्का बसला! आधी हे नीट ध्यानी घ्या बरं. आपल्या दोघांत एकमेकांसाठी आता काहीही शिल्लक नाही. आहे का? आता, मी तुमची बायको आहे, हे खरं आहे. पण बायको असले तरी स्वतंत्र आहे. मी खरं तर माझ्याजवळ जे काही आहे त्याचा कृपावर्षाव इतरत्र करणार होते. पण तुमचं म्हणणं आहे की मी तुम्हाला प्रेफरन्स द्यावा. ठीक आहे. मी तुमच्या म्हणण्याप्रमाणॆ वागायला तयार आहे. पण त्याची किंमत पडेल!"
"मी समजलो नाही."
"मी समजावून सांगते. मी तुमच्या त्या चटकचांदण्यांइतकीच आकर्षक आहे असं तुम्हीच म्हणालात! खरं सांगा, आहे की नाही?"
"त्यांच्यापेक्षा हजार पटीने जास्त आकर्षक!"
"त्यांच्यातील सर्वात देखण्या बाईपेक्षाही जास्त?"
"तिच्यापेक्षाही हजार पट चांगली!"
"मग आता हे सांगा, त्यांच्यातील जी सर्वात जास्त देखणी आहे तिच्यावर गेल्या तीन महिन्यांत तुम्ही किती पैसे उधळले?"
"मला अद्याप काही समजत नाहीये."
"मी म्हणाले, त्या चौघींपैकी जी तुमची सर्वात जास्त आवडती होती, तिच्यावर गेल्या तीन महिन्यांत किती खर्च केलात? पैसा, दागदागिने, खाणं पिणं, भटकणं, मौज मजा या सर्वांसाठी?"
"मला कसं माहीत असणार?"
"तुम्हाला माहीत असायलाच हवं. चला, आपण त्यातल्या त्यात कमी आकडा पकडू या. पाच हजार फ्रॅंक महिना. ठीकाय?"
"अं......ठीक वाटतो."
"ठीक आहे. मग माझ्या हृदयेश्वरा, आताच्या आता, मला पाच हजार फ्रॅक द्या आणि पुढच्या संपूर्ण महिनाभरासाठी मी तुमची झाले! अगदी आज रात्रीपासून!"
"वेड लागलंय तुला."
"तुम्हाला असंच जर वाटत असेल तर मग ठीक आहे. अच्छा, गुड नाईट!"
डचेस उठली आणि सरळ तिच्या बेडरुममध्ये चालती झाली. बिछाना व्यवस्थितपणे तयार करुन ठेवलेला होता. वेगळा न करता येण्यासारखा एक सुगंध हवेत दरवळत होता, पडद्यांना बिलगत होता.
ड्यूक दरवाजात आलेला दिसला.
"छान सुगंध येतोय इथे!" तो म्हणाला.
"अस्सं? परंतु मी अद्याप माझा जुनाच सेंट वापरते. प्यू द एस्पाग्न. मी तो अद्याप बदललेला नाही. "
"खरंच? किती कमाल आहे? पण खरोखर त्याचा फार छान सुगंध येतोय ....."
"शक्य आहे. बरं, तुम्ही आता इथून जाण्यासाठी काय घ्याल? कारण आता मला झोपायचं आहे."
"मार्गारेट!"
"इथून जा."
तो सरळ आत आला आणि आरामखुर्चीत बसला.
"असंआहे तर!" डचेस म्हणाली. "ठिकाय. तुम्ही जितका अधिक वेळ घालवाल तितकं तुमचंच नुकसान त्यात होणारेय."
तिने सावकाशपणे पांघरलेली शाल दूर केली आणि तिचे गोरेपान हात नजरेस आले. आपले केस मोकळे करण्यासाठी तिने हात डोक्याच्या वर उचलले आणि तिच्या काळ्या मखमली झग्याच्या, गळ्याजवळ असलेल्या फेसासारख्या लेसच्या ढगातून गुलाबी रंगाची मांसल किमया किंचित बाहेर डोकावली.
ड्यूक तत्क्षणी खुर्चीतून उठला आणि तिच्या रोखाने पुढे सरसावला.
"जवळ येण्याचा बिलकुल प्रयत्न करु नका." डचेस म्हणाली, "मग मात्र खरोखरच मला संताप येईल."
त्याने तिला आवळून तिचा मुका घेण्याचा प्रयत्न केला. पुढे झुकून तिच्या ड्रेसिंग टेबलावरचा सुगंधित पाण्याचा पेला तिने उचलला आणि खांद्यावरुन तिच्या नवर्‍याच्या तोंडावर सपकन रिकामा केला.
पाण्याने निथळणाऱ्या चेहर्‍यानिशी तो मागे सरकला आणि दातओठ खात ओरडला, "हा एकदम मूर्खपणा आहे!"
"असेल.....पण माझी अट तुम्हाला माहितीय. पाच हजार फ्रॅक!"
"पण हे सर्व काहीतरीच आहे ..... हास्यास्पद आहे."
"कशावरून?"
"कशावरून काय? आपल्या बायकोच्या जवळ झोपण्यासाठी पाच हजार फ्रॅक देणार्‍या नवर्‍याबद्दल कधी कुणी ऐक्लंय का?"
"छी! छी! कसली घाणेरडी भाषा वापरता तुम्ही!"
"ही भाषा घाण असेल कदाचित, परंतु मी पुन्हा म्हणेन की आपल्या बायकोसाठी माणसाला पैसे द्यावे लागावे ही कल्पना वेडपट आहे. मूर्खपणाची आहे."
"घरी चांगली स्वत:ची बायको असतांना बाजारबसव्यांकडे जाणे आणि त्यांच्यावर पैसा उधळणं, ह्याइतकी ही कल्पना मूर्खपणाची नक्कीच नाही."
"तसंही असेल. पण मला ह्याप्रकारे माझं हसू करून घ्यायचं नाहीये."
डचेस एका कोचावर बसली आणि सापाची कात सोलून काढावी तसे आपल्या पायातील घट्ट स्टॉकिंग्ज सावकाशपणे काढायला तिने सुरुवात केली. त्या मुलायम रेशमी वस्त्रांतून तिचे गौर गुलाबी पाय बाहेर पडले आणि हळूवारपणे आपले नाजूक तळवे तिने एकामागे एक खालच्या गालिच्यावर ठेवले.
ड्यूक किंचित जवळ सरकला आणि हळूवार आवाजात म्हणाला, "मार्गारेट, किती विचित्र कल्पना ही?"
"कोणती?"
"तीच! माझ्याकडून पाच हजार फ्रॅक घेण्याची!"
"ह्यापेक्षा अधिक नैसर्गिक काहीही असू शकणार नाही. आपण एकमेकांसाठी अगदी परके आहोत. आहोत की नाही? आणि तुम्हाला मी हवीय. आता तुम्ही माझ्याशी लग्नही करु शकत नाही. कारण आपलं लग्नही एकमेकांशी आधीच झालेलं आहे. मग तुम्ही मला विकतच का घेऊ नये? आणि विशेष म्हणजे इतर कोणत्याही बाईपेक्षा मी नक्कीच स्वस्तात पडेन.
"पुन्हा एकदा विचार करा. कुठल्याही हलक्या सलक्या बाईकडे जाऊन पैशाचा चुराडा करण्यापेक्षा तो घरातच राहू देणं ह्यापेक्षा अधिक कल्पक आणि मनोरंजक काही तुमच्या सारख्या बुद्धीमान माणसासाठी असू शकेल का? बेकायदेशीर प्रेमात जोपर्यंत बराचसा पैसा कुणी उधळत नाही, तोपर्यंत त्याला ते फारसं आवडत नाही असं म्हणतात. आपल्या या कायदेशीर प्रेमाचा अशाप्रकारे एक मोलभाव ठरवून तुम्ही त्याला एक वेगळीच किंमत देत आहात. त्याला बाहेरख्यालीपणासारखं खमंग आणि लफड्यासारखं चमचमीत बनवताय. खरंय की नाही?"
ती उभी राहिली, जवळ जवळ नग्न आणि बाथरुमच्या दिशेने जाताना त्याला म्हणाली, "महाशय, आता तुम्ही बर्‍या बोलाने निघता की मी माझ्या नोकराणीला बोलावू?"
गोंधळलेला आणि उबगलेला ड्यूक तिला बघत जागीच खिळून उभा राहिला आणि अचानक त्याने त्याचे पाकीट काढून तिच्याकडे फेकले.
"ठीक आहे भवाने! हे घे पाच हजार ! पण एक लक्षात ठेव......"
डचेसने पाकीट उचलले, पैसे मोजले आणि हलक्या सुरात गुरगुरली, "काय?"
"ह्याची सवय मात्र लावून घेवू नकोस!"
ती खळखळून हसली आणि त्याच्याकडे येत म्हणाली, " प्रत्येक महिन्यासाठी मोजून पाच हजार फ्रॅक, महाशय! नाहीतर मी तुम्हाला पुन्हा तुमच्या त्या चटकचांदण्यांकडे पाठवलंच म्हणून समजा! आणि झालंच तर ...... जर तुम्ही खुष झालात तर ...... मी माझा रेट वाढवीन सुद्धा!"





1 comment:

  1. खूपच छान... नवरा बाइको यांच्यताल एक मज़ेदार प्रसंग आणि बाइकोचा सामजूतदारपना... मस्त आहे...एक नंबर...

    ReplyDelete