Monday, February 20, 2012


चाळीसगाव येथे ऋषितुल्य जीवन जगलेले आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त महान चित्रकार आणि छायाचित्रकार कै. केकी.एम.मूस यांनी मला 'सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज ऑव्ह गी द मोपासां' हे फ्रेंच भाषेतून इंग्रजी भाषेत अनुवादित झालेले आणि पेंग्विन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक वाचावयास दिले. त्यातील 'इन द बेडरुम' या पहिल्याच कथेने मी अक्षरश: झपाटून गेलो. तोवर मी स्वत: अनुवाद कधीच केला नव्हता. पण ही कथा मराठीत यायला हवी अशा अनिवार ओढीने मी ती अनुवादित केली. पुढे ती 'मेनका' या मासिकात 'शय्यागुहात' या नावाने छापून सुद्धा आली. पुढील ३-४ वर्षांत मोपासांच्या आणखी १५-१६ कथांचे मी अनुवाद केले आणि १९९९ साली त्या कथांचे 'शय्यागृहात' हे पुस्तक पुण्याच्या 'पुष्प प्रकाशना'ने प्रसिद्ध केले. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आमच्या चाळीसगाव येथे मोठ्या दिमाखात साजरा झाला होता. आमच्या माहितीप्रमाणे चाळीसगाव येथे झालेला तो पहिलाच पुस्तक प्रकाशन समारंभ असावा. सकाळ च्या नाशिक आवृत्तीचे त्या वेळेचे संपादक आणि सुप्रसिद्ध लेखक श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. मराठीतील सुप्रसिद्ध गजलकार आणि सध्या लोकमत पुणे आवृत्तीचे सहसंपादक श्री. प्रदीप निफाडकर यांनी केलेले पुस्तक परीक्षण दै. सकाळ मधे छापून आले होते.
या ब्लॉग मधे 'शय्यागृहात' मधील काही निवडक कथा सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आशा आहे वाचकांना ही ई-आवृत्ती आवडेल.
विकास शुक्ल, चाळीसगाव

2 comments: